Sunday, September 25, 2005

पदभ्रमण


पदभ्रमण

मी नुकताच क्लिव्हलंडला जाउन आलो. सुमारे १२०० मैलचे अंतर मी गाडीने दोन दिवसात काटले. इतका मॊठा प्रवास एकट्याने करायचा म्हणजे अंगावर काटा आला होता.
शक्यतो मी माझ्या आयपाँडवर गाणी ऐकतो. पण ह्यावेळी मी तो मित्राला दिला होता.
म्हणुन मग मी मँडीसन लायब्ररीत गेलो आणि काही तबकड्या (सिडी )शोधू लागलो. अ वॊक इन द वुड्स नावाच्या जाड्जूड ध्वनीमुद्रॊत पुस्तकापाशी (Audio Book)थबकलो.
मला पदभ्रमण, गिर्यारोहण, अरण्यवाचन ह्या विषयांमध्ये रुची असल्याने मी ते पुस्तक घेतले आणि निघालो.

गाडी चालवायला सुरवात केली, पहीली तबकडी लावली आणि काय सांगू, क्लिव्हलंड येइअपर्यंत मी ऐकतच राहीलो. नितांत सुंदर!
बिल ब्रायसन नावाचा ब्रिटिश-अमेरीकन पत्रकार आणि त्याचा थोडा विक्षीप्त मित्र स्टिव्ह कँट्स हया अपेलेशीयन ट्रेल (Appalachian trail) हा सुमारे २१०० मैलांचा
रस्ता पदभ्रमण करुन पार केला. त्याचे हे वर्णन आहे. अमेरीकेच्या दक्षीणेतील जाँर्जिया राज्यातुन सुरु करुन उत्तरेत अमेरीका कँनडा सिमेवरील मेन ह्या राज्यापर्यंत ही द्वयी चालत गेली.
त्यचे हे सुंदर वर्णन!

ब्रायसनने तयारी कशी केली, ह्या पदभ्रमणात येउ शकणारया अडचणी, धॊके, ह्याची माहिती. हवामानाची तिव्रता, रस्त्यात भेटलेली माणसे, स्टिव्ह कँट्सचा विक्षीप्तपणा
ह्यचे वर्णन आहे. मग पर्यावरण शास्त्र, हवामान शास्त्र, वन्यजीव, वनस्पतीशास्त्र ह्यांची रंजक माहीती आहे. मधुनच वनखात्याच्या गलथान आणि झाडतोडीला प्रोत्साहन देणारया कारभारावर सडाडुन टिका करतो.

ब्रायसनच्या प्रवासाचे वर्णन ऐकता ऐकता माझा प्रवास कसा झाला कळालेही नाही. आणि माझ्या आवडत्या पुस्तकांच्या यादीत एक भर झाली.

Thursday, September 15, 2005


शिकागो.......पृथ्वीतलावरचे एक अफ़ाट आणी सुंदर शहर!
तुमचा विश्वास बसणार नाही पण मला मी खुप मोठा होईपर्यंत अमेरीकेतील फ़क्त शिकागो हेच शहर माहीत होते. स्वामी विवेकानंदांच्या विश्वधर्म संमेलनामुळे..... २००२ साली जेंव्हा मी प्रथम इथे आलो होतो त्यावेळी स्वामीजींनी भाषण केलेलया जागी जायची इच्छा होती. पण कळाले की एका आगीत ते सगळं जळून गेले.

२००४ साली मी इकडे नोकरी साठी आलो आणी आता प्रेमात पडलोय! ह्या नगरीची अनेक लोभस रुपं आहेत. मरीन ड्राईव्हची आठवण करुन देणारा लेक शोअर ड्राईव्ह!उंची कपड्यालत्त्यांच्या दुकानांनी भरलेला मॆग्निफ़िशीयंट माईल! वळणावळणांनी जाणारी शिकागॊ नदी! वास्तूरचनेचा सुंदर नमूना म्हणता येतील अश्या अनेक इमारती असलेला उत्तर मिशिगन अव्हेन्यू, नेव्ही पिअर आणी
सर्वात महत्वाचे..मुंबईचा भेंडी बाजार, दिल्लीचा चांद्णी चौक, हैद्राबादचा चारमिनार आणी रमझानच्या काळातील पुणे कॆम्प ह्याची एकदम आठवण करून देणारा डेव्हान उर्फ़ म. गांधी मार्ग ! ह्या भागात फ़िरणे खुप नॊस्टाल्गीक असते. इथे बहुतेक सगळे उत्तर हिदुस्थानी, हैद्राबादी, पंजाबी, बंगाली, गुजराथी, पाकीस्तानी खाणे मिळते. मराठी पदार्थांची मात्र वानवा आहे
भारतीय जिनसा, किराणामाल, कपडे, दागदागीने, विड्याची पाने, हिंदी सिनेमाच्या कॆसेट, सिड्या, भारतीय न्हावी, क्वचीत शिंपी..... हा छोटा भारतीय उपखंड आहे. भारतीय उपखंड म्हणायचे कारण इथे पाकीस्तान्यांचे चांगलेच अस्तीत्व आहे. इकडे भारतीय स्वत:चा देसी असा उल्लेख करतात. पाकीस्तान्यांनी स्वत:ला त्यात समाविष्ट करुन घेतले आहे.

डेव्हान ला म. गांधी मार्ग असेही नाव आहे. त्यालाच पुढे जिन्नाह रोड असेही म्हणतात. एका गल्लीला शेख मुजीबूर रहमानचेही नाव आहे.

घरापासुन हजारो कोस दूर असूनही चार क्षण स्वदेशात असल्याचे सुख देणारा हा डेव्हान....... Posted by Picasa

Monday, September 12, 2005

एका मक्षीकेने

आज एक अत्यंत विलक्षण दृष्य पाहीले. एका गांधीलमाशीने एका पतंगाची शिकार केली.

मी सध्या मॆडिसन, विस्कोनसीनच्या पश्चीमेच्या एका उपनगरात काम करतो आहे. कार्यालयाच्या आजुबाजुला खुप झाडी आणी शेती आहे.वाहनतळाच्या बाजुला मकयाचे मोठे शेत आहे. सध्या त्याची कापणी चालू आहे.
आज दुपारी एका पतसंस्थेशी बोलायचे होते म्हणुन मी वाहनतळापाशी आलो. भ्रमणध्वनी वापरून त्यांना संपर्क साधला तर नेहमी प्रमाणे त्यांनी "आप कतार मे है" चा रट्टा लावला. कानाला भ्रमणध्वनी लाउन वाहनतळातून चालताना बाजूच्या हिरवळीवर आलो. तेथे काही माशा रोरावत होत्या.सुरवातीला मला त्या शेणमाशा आहेत असे वाटले पण निरखून पाहीले तर त्या गांधीलमाशा होत्या. मधमाशीच्या आकाराच्या पण पिवळ्या रंगाच्या ह्या माशा गवतावर रोरावताना पाहून मी आश्चर्यचकीत झालो. कारण माझ्या माहितीनुसार गांधीलमाश्या मातीचे घर बनवतात. (भारतात आमच्या घरी जाईच्या वेलावर केलेले घरटे तोडताना मल एक माशी कडकडून चावली होती.)

तेवढ्यात फ़ोनवर एक ठमाकाकू आली, थोडीफ़ार विचारपूस करून "आप कतार मे है" चा रट्टा लावून निघून गेली. माझे लक्ष्य पुन्हा माश्यांकडे. ५ x५ च्या एका हिरव्या पट्ट्यावर अविरतपणे सुमारे सहा माश्या उडत होत्या.
त्या हिरवळीत ऒल होती, म्हणुनच बहुदा किटक आकर्षीत होत होते.

कुठुनतरी तिकडे एक पतंग आला. म्हणजे रुपरंग नसलेले फ़ुलपाखरू! एक दोन गिरक्या मारल्या आणि कोणीतरी तरी त्याला धरुन ठेवावे असे काहीतरी उडु लागला. मला सुरवातीला काही कळले नाही की हा पतंग मांजा कट झाल्यासारखा
का उडतोय? पण बारकाईने पाहीले तर मला धक्का बसला. एका गांधीलमाशीने ह्या पतंगाच्या पोटाला चावा घेउन तिथेच बसली होती. तो जिवाच्या आकांताने उडत होता, पडत होता, कोलमडत होता पण तीने पाश आजीबात सैल सोडला नाही. ती जागची हलत नव्हती. बाकीच्या माश्या उडत उडत येउन पतंगाला दंश करुन जात.

मग काही वेळाने त्याचा विरोध मावळला. तो गलीतगात्र झाला. मग बाकीच्या माशा आल्या आणी त्याला दंश करून होती नव्हती ती धुकधुकी घालवत होत्या. तो पूर्ण निपचीत झाल्यानंतर त्याला सर्व माश्यांनी मिळून गवतात थोडे खोल नेले. बघता बघता तिथे दहा बारा माश्या गोळा झाल्या आणी शिकारीवर ताव मारू लागल्या.
संध्याकाळी येऊन पाहीले तर पतंगाचे अवशेष ही राहीले नव्हते.

हे मला पूर्णपणे नवीन होते, मी माश्यांच्या ह्या सामुदायीक शिकारीबद्दल कधीच वाचले नव्ह्ते. रानटी कुत्री किंवा लांडग्यांच्या कळपाने शिकार करावी इतक्या सफ़ाईने ह्या गांधीलमाश्यांनी ही शिकार केली.

ह्याबद्दल कोणला काही माहिती असेल तर कळवावी.

Saturday, September 03, 2005

ढोबळी मिरची की भोंगी मिरची...


ढोबळी मिरची की भोंगी मिरची...

माझा आणी माझ्या बायकोचा एक वाद आहे. ढोबळया मिरचीला (Capsicum or Green Pepper) ढोबळी मिरची म्हणायचे की भोंगी मिरची! म्हणजे ती भोंगी मिरची म्हणते आणी मी ढोबळी!
कॊण बरोबर?

ढोबळया मिरचीचे गुणधर्म "ढोबळ" ह्या शब्दाने व्यक्त होतात की ते भोंगे आहेत?

ढोबळ म्हणजे ठोकळ, अनिश्चीत, विशीष्ट परीमाण नसलेले, गोळाबेरीज! आपण एखाद्या गोष्टीची 'ढोबळ' व्याख्या करतो! त्यामुळे ढोबळया मिरचीला ढोबळी मिरची म्हणायला हवे! कारण तीला काय आकार असतो हो? कोणत्याही शब्दाने व्यक्त न होणरया ह्या भाजीला ढोबळच म्हणायला नको का?

आता आपण भोंगी किंवा भोंगेपणाचा अर्थ पाहुया. भोंगा म्हणजे कर्णकटू आवाज करणारे वाद्य!आपल्या रिक्शाला जो लावलेला असतो भोंगा!तसे़च लेंगा किंवा नउवारी साडीच्या मांडी कडील फ़ुगीर भागाला भॊंगा म्हणतात! सगळे भोंगे फ़ुगीर असतात आणीक ढोबळी मिरची फ़ुगीर असते इतकेच काय ते साम्य! एवढ्या साठी ढोबळया मिरचीला भोंगी मिरची म्हणायचे? मग कांदा, तंबाटी (टोमाटो ),नवलकोल,बिट, ढेमसं ह्या सगळ्यांना भोंगा जोडावा लागेल!

माझा युक्तीवाद पटतोय ना मंडळी? तरी पण बायकोला काही पटले नाही. त्यामुळे आजकाल आम्ही एकाच भाजीला वेगवेगळ्या नावाने संबोधतो.

क्लीव्हलंडच्या भाजी बाजारात आम्ही बरयाच वेळेला भाजी आणायला जायचो. भाज्यांची मांडणी आणि रंग पाहून मी हरखुन जायचो.एकदा कॆमेरा घेउन गेलो होतो. फ़ोटोतील मुलगी "ढोबळ्या मिरच्या" विकत होती. तीला विचारले की, "भाज्यांचा फ़ोटो काढु का? "

ती म्हणाली की जर माझा काढणार असशील तरच भाज्यांचा फ़ोटो काढ!
भाज्यांच्या ढिगामागे लपलेल्या ह्या हसरया ललनेचा फ़ोटो माझ्या आवडत्या फ़ोटोंपैकी एक आहे.  Posted by Picasa

Thursday, September 01, 2005

साईबाबा

मागच्या गुरुवारी मी शिकागोपासून ७० मैलांवर असलेल्या साईबाबांच्या मंदीरात गेलो होतो. एका जुन्या चर्चचे रुपांतर मंदीरात आहे. तिकडे मला खुप वेगळा अनुभव आला.
आठवणी आणीक अनुभवांचे हे विवेचन!

मी साईबाबांचा भक्त नाही. खरे सांगायचे तर सत्य साईबाबांना पाहुन शिर्डी साईबाबांविषयी माहीती करुन घ्यावी असे कधी वाटलेच नाही. तुकाराम बुवांनी सांगीतल्या प्रमाणे चमत्कार करणारया बुवांपासून दुर राहीलो.

पण अनेक लोक साईबाबांचे भक्त असतात, बहुतेक तेलुगू मंडळी तर निस्सीम भक्त असतात.(मला ५ साई नावाचे तेलुगू भाषीक मित्र आहेत. साईकिरण,प्रेमसाई,साईप्रकाश,सत्यसाई आणि नुसता साई ! ) काही मित्रांनी आग्रह केला म्हणुन मी जन्माष्टमीच्या दिवशी मी गेलो.सुमारे ५० जण जमले होते. सायंआरती नंतर पालखी होती. आणी नंतर प्रसाद! सर्वात मजेची गोष्ट म्हणजे मी एकटा मराठी होतो, बाकी सगळे तेलुगू आणी गुजराथी पण सगळी भजने, आरत्या मराठीत होत्या. मला सगळे समजत होते पण काहीही म्हणता येत नव्हते. बाकीचे सगळे तेलुगू लिपीत लिहिलेले म्हणत होते, पण त्यांना काही कळत होते का माहीत नाही.तेलुगू ढंगाने गायलेली मराठी भजने ऐकणे हा खुप वेगाळा अनुभव होता.

हे मंदीर सेंट पीटर च्या चर्च मध्ये आहे. म्हणजे हिंदु समाजाने ते चर्च विकत घेतले आणि त्याचे मंदीरात रुपांतर केले आहे.तिथे उभे राहुन भजने म्हणायला इतके वेगळे वाटत होते की मला बरयाच वेळेला मी नुकताच बाप्तीस्मा घेउन येशूची आळवणी करत आहे असे वाटले. आणी हे रुपांतर ही खुप मजेशीर होते. चर्चच्या सर्वात उंच मनोरयावर जेथे क्रुस असतो, तेथे कळस लावला आहे. आतील व्यासपीठावर, जेथे पाद्री उभाराहून भाषण देतो, तेथे साई बाबांची मूर्ती आहे. छतावर टांगलेली रोमन झुंबरे तशीच ठेवली आहेत आणी सर्वत्र मंद प्रकाश पसरतो. चर्चच्या रंगीबेरंगी खिडक्या तश्याच ठेवल्या आहेत.पटांगणात एक फ़लक आहे, ज्यावर बायबल मधील वाक्ये लिहिलेली असतात, त्याफ़लकावर उपासनेच्या वेळा लिहिल्या आहेत.भारतात असताना कोणत्याही इस्लामी वास्तूत गेलो की मी तेथील हिंदु खुणा शोधायचो (बरयाच इस्लामी वास्तू हिंदु मंदीरे, राजवाडे पाडून बांधले गेले आहेत असे इतिहास सांगतो म्हणुन ) पण इथे साक्षात गंगा उलटी वाहत हॊती. एकाच वेळी मला आपला धर्म प्रसार पाहून छान वाटत होते पण मंदीरात असताना वाटणारा मोकळेपणा जाणवत नव्हता.

मंदीराच्या तळघरात भारतवर्षातील तमाम गुरुंच्या तसबीरी होत्या.महाराष्ट्रातील द्यानदेव, तुकाराम, एकनाथ, नामदेव, रामदास अश्या वारकरी संप्रादयातील संताना सोडून बाकी सगळ्या गुरुंचा समावेश होता. त्यात पुण्याच्या शंकर महाराजांचा फोटो पाहून मात्र मी खुश झालो, माझ्या घराजावळ आहे ना त्यांची समाधी!

त्यात बाबा जानचा फोटो आहे. आमच्या एका नातलगांच्या दुकानात जाताना पुण्याच्या हजरत बाबा जान चौकातुन जावे लागायचे. मग एकदा कळले की बाबा जान ही स्त्री होती.मला एकांनी तीची गोष्ट सांगीतली.
लहान वयात बाबा जान लग्न करायचे नाही म्हणुन अफ़गाणीस्तानातून पळुन पुण्यात आल्या. साई बाबांच्या त्या समकालीन! त्यांनी मेहेर बाबा नावाच्या एका पुढे प्रसिद्ध पावलेल्या गुरुंना दिक्षा दिली.

साईबाबांच्या अस्सल फ़ोटोच्या काही प्रती पाहील्या आणि नतमस्तक झालो. त्यांच्या चेहारयावरचे ते कारुण्य आणी सात्वीकतेचे भाव पाहून मी त्यांना शरण गेलो.

काही गोष्टी मात्र खटकल्या! आपल्याकडे काही सज्जन मंडळी धर्माच्या भिंती ऒलांडुन अध्यात्मात रममाण झाली आहेत कबीर, गुरु नानक, बुलेशाह, साईबाबा अशी काही आदर्णीय उदाहरणे आहेत. त्यांना परत धर्माच्या भिंतीत कोंडुन ठेवणे हे अत्यंत क्लेशकारक आहे. साई बाबांची अर्चना अगदी शंकर, विष्णु, गणपती सारखी करणे म्हणजे करंटेपणाचे लक्षण आहे.