Thursday, January 29, 2009

तुझा धर्म कंचा?

परदेशात राह्ताना आपण अल्पसंख्यांक असल्याचा कधी कधी अनुभ्व येतो. बहुतांशी अमेरिकन सहिष्णू आणि तुमच्या मताचा (राजकिय, धार्मिक) आदर करणारे असतात. ह्याविषयांवर वाद टाळणारे असतात. तुम्हाला तुमची ओळख जपू देतात.
.....अपवाद ईव्हानजेलीकल नामक मूलतत्त्ववादी...... ते तुम्हाला कुठेही पकडून येशूचे थोरवी सांगतील, व त्याला न स्विकाराल्यास तुम्ही नरकात जाल असे बिनादिक्कत सांगतील....

पण अापल्याकडे, भारतात लहान मुलांना धार्मिक नेणीव ( identity) ओळख केंव्हा होते? मी आठवून पाहिले तर मला माझ्या आईवडिलांनी "आपण हिंदू आहोत" असे कधीही सांगीतल्याचे आठवत नाही. उलटपक्षी मी सात वर्षांचा असताना बोलताना माझी एक काकू मला म्हणाली की आपण हिंदू आहोत. मला ती संकल्पना खुप परकी वाटली. हिंदि बोलणारे म्हणजे हिंदू असे मला वाटले. आपण तर मराठी बोलतो, मग ही आपण हिंदू आहोत असे का म्हणते आहे? मधुराचा अनुभवही असाच अाहे.

माझी हिंदू नेणीव ही खुप उशीरा म्हणजे मी १३/१४ वर्षांचा असताना, मुख्यत: वाचनातून झाली. मधुराची अजुनही होत अाहे.

पण अमेरिकेत पालक मुलांची धार्मिक नेणीव ( identity) निर्माण करण्याचा मुद्दाम प्रयत्न करतात. संडे स्कुल, समर कॆम्प, मद्रासा अश्या उपक्रमातुन मुलांमधील धार्मिकता वाढीस लागते. त्यासंदर्भातील काही अनुभव......

तीन वर्षांपूर्वी शिकागो विमानतळावर विमानाची वाट पाहत होतो. रमजानचे दिवस होते. मी बेगल- कॊफी खात बसलो होतो. बाजूला बसलेला, भारतीय वाटणारा एक ८ ते १० वर्षांचा माझ्याकडे बराच वेळ निरखुन पाहत होता. काही वेळाने मनातील उत्सुकता न रोखता आल्यासारखा मला म्हणाला, " आर यू नॊट फ़ास्टींग? यु आर मुस्लीम राईट? "

मी थक्क झालो. काय बोलावे ते मला कळेना. एवढ्या लहान मुलाशी काय वाद घालणार? "मला भुक सहन होत नाहीये" असे काहीतरी म्हणालो अाणि त्याला टाळले.

दुसरा अनुभव मधुराचा अाहे. क्लिव्हलंडला असताना निधर्मी विचारांच्या ज्यू प्राध्यापकांकडे एका पार्टीला गेली होती. तिकडे बहुतांशी लोक ज्यू धर्मिय होती. मधुरा खुर्चीत बसुन जेवताना एक ८ वर्षांची मुलगी तिकडे अाली व म्हणाली, " अार यु ज्यू? " मधुरा गोंधळली, "नाही" असे म्हणाली.


धार्मिक नेणीव ( identity) तिव्र झाली की मग "आमच्यातील" व "त्यांच्यातील" ही जाणीव ही वाढू लागते.

मुलांमध्ये धार्मिकता असावी, पण धर्माभिमान नसावा. ह्याचा एक सुखद अनुभव नुकताच अाला. मागच्या अाठवड्यात दन्तवैद्याकडे गेलो होतो. डॉक्टरांनी बोलावण्याची वाट पाहत होतो. वेळ येईपर्यंत माझ्या अायफोनवर गाणी ऐकत बसलो. एक भारतीय दिसणारा ८- ९ वर्षांचा मुलगा माझ्या फोन कडे पाहत होता.
मला एकदम उसळुन म्हणाला, "तुला माहित अाहे का, ह्यावर तुला व्हिडीअो पण पाहता येतात?"

मी अाश्चर्याचा भाव अाणून म्हणालो, "नाही!"
मग त्याचा चेहरा खुलला. एखाद्या प्राध्यापकासारखा उभा राहून त्याने मला माझ्या अायफोनचे प्रात्यक्षीत दिले. त्याच्या वडिलांच्या फोनवर त्याने काय काय अप्लीकेशन टाकली अाहेत, अाणि कुठली अप्लीकेशन "कूल" अाहेत ह्याची जंत्री दिली.

"माझ्याकडे काही चित्रपट अाहेत, ते मी अायफोनवर पाहू शकतो का? "

"नक्कीच, पण त्यासाठी तुला लॅपटॉप अाणि एक वायर लागेल, अाहे का तुझ्याकडे अाहे ?" त्याने लगेच उत्तर दिले.

मी मनोमन म्हणालो, लेका तुझा अाणि माझा धर्म एकच!

Labels: , , ,