Sunday, August 28, 2011

माझ्या आईची कहाणी

आम्हासी पुसले त्यांनी,

मराठीं किमर्थं वदति

संस्कृत असे देवभाषा, सर्व भाषांची जननी

संस्कृत असता इथे प्राकृताची काय थोरवी



असेल तुमची ही लेक पण ही तर माझी आई

वेदाचे सार नवनीतापासरे आम्हासी भरविती


आमची पर्यन्दे ही भाषा

आमुचे बोबडे बोल ही भाषा




माझ्या आईचे शब्द असे

की अमृताच्याही पैजा जिंके

------------------------------------------------------------

आम्हासी पुसले त्यांनी

चेरा मराठी सोह्भात नेमी

यवन आम्ही राज्यकर्ते

दस्यू भाषेस कोण पुसे



फारसी जाणाल तर देऊ उत्तम कारकुनी

व्हाल वकिल आमुचे किंवा घ्या सुभेदारी



ही भाषा आमुच्या धर्माची, ही भाषा आमुच्या अस्मितेची

जोडते नाळ आमुची

त्या थोर तुक्याशी, शिवाबाशी आणि समर्थांशी



ही भाषा माझी शिवाई, ही भाषा माझी जिजाई

समशेर हाती थोपवुनी, स्वराज्य स्थापन करविती

-------------------------------------------------------------------------------------



आम्हासी पुसले त्यांनी,

व्हाय डू यु स्पीक मराठी

इंग्रजी म्हणजे वाघीणीचे दुध

धष्टपुष्ट व्हाल, बारिष्टरी कराल

किंवा जाऊन विलायतेस

जिंकून घ्याल आयसीएस





ही भाषा जहाल विचारांची

जन्मसिद्ध हक्क देणारी

ही भाषा मवाळ विचारांची
सुधारकांच्या चळवळीची
सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? हे विचारते

ती माझी भाषा

सागराचाही प्राण तळमळेल अश्या यातना सहन करणारी

ती माझी भाषा

घटनाकारांची आई

ती माझी भाषा

------------------------------------------------------------------



झाली वर्षे हजार

अजुनही करतोय तीची देखभाल

झुंडीवर झुंडी येत राहतात

आईचे शब्द कोंडून घालतात

आताशा फक्त घरातच बोलतो

किंवा मनाशीच पुटपुटतो

बाहेर आपलं, भैय्या कोथींबीर कैसी दी

साला मराठी बोलना ही गलती थी



विचारते एवढीशी पोर माझी

व्हाय डू यू स्पिक मरौठी डॆडी

ओक्साबोक्शी रडत मी पुसतो

व्हॊट डीड आय डू रॊंग मॊमी