Sunday, December 13, 2009

महर्षिनगर

आताच्या भेटीनंतर जाणवले की महर्षिनगर पार बदलून गेले अाहे. आणि आता तर माझ्यासाठी तर ते पार बदलून जाईल. मधुमंगेश मधील आमचं घर आता राहणार नाही. त्याजागी नवी वास्तू होईल.

बदल हे मानवी जीवनाचे लक्षण आहे. पण इतक्या कमी काळात एवढा मोठा बदल, इतक्या सहजपणे होतो हे पाहून आश्चर्य वाटत राहते.

माझे वडील, शेजारचे काका ह्यांच्याकडून महर्षिनगरचा इतिहास ऐकला होता, पण त्याआधीचा इतिहास माझ्या साडूच्या, किरणच्या वडीलांकडून ऐकला. ते १९६५ पासून तेथे राहत आहेत.

महर्षिनगर निर्माण झाले ते पूरग्रस्तांच्या वसाहतीसाठी, १९६२ नंतर! त्याआधी तेथे काय होतं हे मला माहीत नाही. पण तो वेगळा संशोधनाचा विषय आहे.

किरणचे वडील आले तेंव्हा चाळींच्या दक्षीणेला काहीही नव्हते.... ना मधुमंगेश ना गीतगोविन्द ना ज्योत्स्ना! डोणवाडांचा बङगला ६२/६३ ला बनला आणि त्याचवेळी चाळी! त्यावेळी आजच्या शिवाजी पुतळा- काळूबाई मन्दीरापासून ते झाला कॉम्प्लेक्स पर्यन्त जंगल होते. तेथे कंजारभाट लोकांच्या दारूच्या भट्ट्या होत्या. तेथे पोलीसही जायला घाबरत. सरदार पानश्यांच्या जागेत मधूमंगेश होऊ लागली, त्याचसुमारास मार्केटयार्डाची स्थापना झाली; तेंव्हा मग शासनाने मोठा फौजफाटा पाठवून त्या भट्ट्या बंद केल्या.


आम्ही मधुमंगेश सोसायटीमध्ये रहायला आलो तेंव्हा सगळ्याच बंगल्यांमध्ये लोक रहायला आले नव्हते. शिवाय गोवर्धनमधील ४ ते ५ प्लॉट रिकामे होते. लालबाग सोसायटी नसल्यामुळे फाटकांच्या आवारातून मार्केटयार्डाची वाहने दिसायची. तेथील विहीरीचे आकर्षण होतेच, शिवाय पळनीटकरांच्या बाजूने ओढयाला प्रवेश होता. लालबागच्या विहीरीत आणि ऒढ्यात विविध प्रकारचे मासे होते, आम्ही ते पकडायला जायचो. मला कधीच जमले नाही, पण एकाने काकडी एवढा जाड मासा पकडलेला मला आठवतोय. खेकडे होते, पण सगऴ्यात जास्त खेकडे महाराष्ट्र मंडळ शाळेच्या मागे कॅनॉलमध्ये होते. तेथे मी ताटाएवढा खेकडा पकडलेला पाहीला होता.

मधुमंगेश आणि गोवर्धनमध्ये सगळ्या मोकळ्या जागेत भरपूर गवत यायचे. सापांची वारूळे होती. आमच्या घरात आलेले ३ ते ४ साप मारलेले आठवत आहेत. साप मारण्यात अतुलदादा आणि जगतापांचा बाळू हे प्रविण! ८४ ते ८५ साली आमच्या बागेत चिखलात जाडसर पट्टा आढळुन यायचा, तो अजगराचा आहे असे अनुमान काढले होते. खुप घबराटीचे दिवस होते, कोणीतरी सांगीतले होते की बैलाची शिंगे जाळली की अजगर जवळ येत नाही, म्हणून बैलबाजारातून शिंगे आणून घमेल्यात ठेऊन जाळायचो. त्याचा उपयोग झाला म्हणायचा, कारण तसे पट्टे नंतर कधीच दिसले नाहीत.

ज्योत्स्ना सोसायटीच्या मागे, आताच्या निसर्ग कार्यालयाच्या जागेत गुरांचा बाजार भरायचा, आठवड्यातून दोन वेळेला. माझे आजोबा शेतकरी असल्याने त्यांना गुरांची विशेष ओळख होती आणि मला ते घेऊन जायचे. खुप लहानपणीच मला देशी गाय- जरसी गाय, पंढरपूरी म्हैस- जाफराबादी म्हैस, खिलारी बैल, ह्यांची माहीती झाली. तेथे बैलांना नाल ठोकण्याचे काम चालायचे. पाय बांधून जमीनीवर आडवा पाडलेला बैल इतका भेदरलेला असायचा अाणि त्याचे डोळे बटाट्याएवढे व्हायचे.

एकदा मी तीथे एक सशांची जोडी विकायला आलेली पाहीली, त्यांचे लालचुटुक होळे पाहून मी हरखून गेलो होतो. "ससे फार घाण करतात " असा आमच्या एका नातलगांनी सगळ्यांचा समज करून दिला होता, त्यामुळे आमच्याकडे कधीही ससे आले नाहीत.

महर्षिनगरमध्ये पूर्वी रानटी ससे होते, पण मी कधी पाहील्याचे आठवत नाही. मुंगुसे मात्र खुप होती, अजूनही आहेत, मधुन मधुन दिसतात. कावळे, चिमण्या, घारी, पोपट, साळुंख्या, होले, पारवे, छोटे बुलबुल, मोठे बुलबुल, दयाळ, कोकीळ, वेडे राघू, भारद्वाज आणि वटवाघूळे हे पक्षी अजूनही दिसतात. ओढ्यावर खंड्या हमखास दिसायचा. आंब्यांच्या दिवसात पोपटांचा थवा झाडावर यायचा. किंबहुना दिवस पोपटांच्या किर्राटाने उजाडायचा. अर्धवट खाऊन आंबे टाकायचे, सीताफळं खायचे, पेरू खायचे, डाळींबं खायचे. सर्वात विचित्र म्णणजे सोनचाफ्याच्या बिया खायचे, किती कडू असतात त्या! त्यावेळी खुप राग यायचा, फळांची नासधूस करतात म्हणून, पण त्यांचा पण वाटा आहेच की!

दोन तीन वेऴा रानटी हुप्प्या माकडांची टोळी आली होती. त्यांनी खुप धुमाकुळ घातला होता, बाथरुमच्या काचा फोडल्या होत्या. गुजरांच्या गच्चीवर बसलेली माकडे आणी आरडा ओरड करत त्यांना हुसकाऊन लावण्याचा प्रयत्न करणारया नलीनी काकू अजूनही माझ्या डोळ्यासमोर आहेत.

त्यावेळी गोवर्धनच्या मैदानाला कुंपण नव्हते. उन्हाळ्याच्या सुट्टीत तेथे आम्ही दिवसभर क्रिकेट खेळायचो आणि संध्याकाळी शाखेत जायचो. पावसाळ्यात सर्वत्र गवत वाढायचे. कॉंग्रेस गवत (आणि पक्ष ) ह्यांची ओळख तेंव्हाच झाली. त्या माजलेल्या गवतातून सापांची भिती मनात ठेऊन आम्ही फुलपाखरे पकडत हिंडायचो. फुलपाखरांना मनानेच काही नावं दिली होती. दुधी, पिवळं, लाईट्या, लक्ष्मण गीड्डा ही नावं उच्चारली की तत्काळ ती ती फुलपाखरं माझ्या डोळ्यासमोर येतात. लाईट्या हे फुलपाखरू हिरव्या पिवळ्या आणि काळ्या ठिपक्यांचे होते आणि अतिशय चंचल, मला ते कधीच पकडायला जमलं नाही. सर्वात सुंदर म्हणजे चतुर! त्यांना आम्ही हेलीकॉप्टरही म्हणत असू. त्यात काळे आणि लाल असे दोन प्रकार होते. त्यांचा अजून एक भाईबंद म्हणजे सुई ! चतुरासारखीच पण खुप नाजूक, उडण्याचा वेगही मंद! दहा पंधरा दिवसांचं आयुष्य असणारया अनेक किटकांचे आयुष्य मी अजुनच कमी केलं होतं!

संध्याकाळ झाली की वटवाघूळे वेडीवाकडी उडत, समोरच्या उंबराच्या झाडाची उंबरं खात आणि दिवसभर आमच्या नारळाच्या झाडाला उलटं टांगून घेत. एकदा मी नवी गलोल केली, आणि सहज म्हणून वटवाघळाला दगड मारला. तो इतका वर्मी बसला की ते खाली पडलं आणि माझ्यासमोर तडफडून मेलं. दोन अडीच फुट लांब पंख असलेलं ते असं वाघूळ निश्चल झालेलं पाहून मी परत कधी कोणत्या प्राण्याला मारलं नाही.


गलोलीची अजून एक आठवण म्हणजे मी एकदा उडत्या कावळ्याला नेम धरून दगड मारला, ट्रॅजेक्टरी जमून आली आणि कावळ्याचा वेग पाहता हे निश्चीत होतं की दगड कावळ्याला लागणारच! पण दगड साधारणत: दोन फुटावर असताना कावळ्याने आपला मार्ग बदलला आणि माझा दगड चुकवला. कावळ्याची हुषारी पाहून माझ्याकडून वाहवा निघून गेली.

पावसाळ्यात बेडूक दिसायचे. श्रावणात सर्वत्र बेडकाची पिल्ले इकडून तिकडे उड्या मारत फिरायची. पिल्लांना पकडून पावसाच्या पाण्यात सोडून त्यांचे पोहोणं पाहणे हा माझा आवडता उद्योग होता. पण अनेक पक्षी त्या पिल्लांवर यथेच्छ ताव मारायचे. त्याच सुमारास काही पक्ष्यांची घरटी गजबजलेली असायची. एकदा आमच्या गुलाबाच्या ताटव्यात एका बुलबुलाने घरटे केले होते, दुपारी शाळेतून आले की पिल्ले पहायला जाणे हा आमचा उद्योग होता. कोणी जवळ गेले की आई आली असे वाटून ती पिल्ले चोची उघडून आवाज करू लागत. मग ती पिल्ले मोठी झाली आणि इकडून तिकडे उडू लागली. एक पिल्लू उडून माझ्या काकूच्या पदरात पडल्याचे मला आठवत आहे.

आजच्या सङगम सोसायटीच्या जागेवर सङगम मेटल्सचा कारखाना होता. फर्नेस पेटली की कोळश्याचा वास आसमंतात पसरायचा, पांढरा धूर खुप लांबून दिसायचा आणि तांबड्याबुंड लोखंडावर मारले जाणारे घाव ऐकू यायचे. हे सगळं पहायला आम्ही कधी कधी जात असू. पुढे कधीतरी हा कारखाना बंद पडला आणि त्याजागी इमारती झाल्या.


महर्षिनगरचे रस्ते मोठे होते. चाळींचे दरवाजे मुख्य रस्त्यांपासून खुप आत होते. चाळींचे उभे आडवे विस्तारीकरण झाले नव्हते. संध्याकाळी महाराष्ट्र मंडळातून यायला उशीर झाला तर रस्त्यांवर शुकशुकाट व्हायचा. १४१ आणि १४२ ह्या बसेस सोडल्या तर बाकी कोणत्या बसेस नव्हत्या.

दुघकेंद्र श्रीपालचे आणि सान्यांचे विद्यापीठातील किराणा मालाचे दुकान सोडले तर दुसरे दुकान नव्हते. संध्याकाळी दुध मिळायला अवघड असायचे. शाळेत जाताना आई दळण आणायला टिमवीतील दुकानात जायची. आई आणि आजोबा महिन्याचा किराणा आणायला भवानी पेठेत जात. महर्षिनगर ही फक्त रहायची जागा होती आणि सर्व प्रकारच्या खरेदीसाठी लोक गावात जात.

आमच्या कॉलनीत शांताराम काकांची विजय सुपर सोडली तर सर्वजण सायकल किंवा बसने ऒफीसला जात. शाळेत पायी जात असू आणि टिव्ही पहायला शेजारयांकडे! १९८३ चा क्रिकेट वर्ल्डकप गाडगीळांकडे पाहिल्याचे मला आठवते आहे. गणपतीच्या काळात पटांगणावर मोठ्ठा पडदा लाऊन त्यावर हिंदी सिनेमे दाखवत. त्याबद्दल खुप आकर्षण असायचे.

ते महर्षिनगर आणि आजचे महर्षिनगर पाहिले तर मी खुप म्हातारा झाल्यासारके वाटते आहे. आजचे महर्षिनगर पूर्वि तसे होते, २५- ३० वर्षात एखादी वसाहत इतकी बदलली ह्यावर विश्वास बसणे अबघड जाते.