Tuesday, June 22, 2021

| कमळाख्यान |



 दहावी ची परीक्षा नुकतीच पूर्ण झाली होती.  सुटी मध्ये काहीतरी शिकायला म्हणून मी ज्ञानेश्वर  विद्यापीठात  म्हणजे  लॉ  कॉलेजात हॅम रेडिओ बद्दल शिकायला जायला लागलो.  रोज  सहा  किलोमीटर सायकल मारत मी प्रथमच एकट्याने  नदीच्या  पल्याडचे पुणे पाहत होतो आणि आमच्या महर्षीनगर पेक्षा ते नक्कीच मनोहर होते.  ऐसपैस  घरे , क्वचित  कधी तरी पाहिलेल्या  होंडा  सारख्या मोटारी , जातिवंत श्वान आणि त्याचे तोऱ्यात वावरणारे  मालक. मालकिणी... 

एक दिवस मी लॉ  कॉलेज रस्त्यावर  एका घरात  उमललेली सुंदर कमळे  पहिली आणि हरखून गेललो  तो पर्यंत   कमळांबद्दल केवळ संस्कृत सुभाषितांमध्येच ऐकले/ वाचले होते. त्यावेळी सारसबागेत किंवा कोणत्याही  सार्वजनिक उद्यानामध्ये कमळे लावली गेलेली नव्हती.  

राजकारणात ही  कमळाचा उदय झालेला नव्हता. 

एक दिवस मी धीर करून त्या बंगल्या पाशी थांबलो. एक बाई आणि त्यांचा माळी काम करत होते. मी बाईंना कमळाचे रोप द्याल का असे विचारले.  "नाही आम्ही अशी रोपे वगैरे देत नाही. " असे स्पष्ट पुणेरीत सांगून टाकले. 

घरी कमळे लावायचीच ह्या विचारांनी  एम्प्रेस गार्डन  च्या नर्सरी मध्ये  जाऊन आलो , तेथे ही रोप मिळाले नाही.  मग काही महिन्यांनी  कोणीतरी सांगितले की पाषाण च्या तलावात  कमळे आहेत , तेथे सायकल मारत गेलो आणि काही कंद आणले आणि आमच्या हौदात लावले.  
एकेदिवशी त्याला फिकट निळे  असे  फुल आले आणि एकदम भारी वाटले.  पण फुलाबरोबर  तलावातून  कंदाला  चिकटून गोगल गाई  आल्या आणि काही दिवसात हौद भरून गेला. डास  वाढले, मग गपी  मासे आले.  आणि आमच्या हौदाची जैव विविधता  वाढली. 

मग एके दिवशी सचिन रायरीकरच्या ओळखीतून  प्रभात तोड वरील एका बंगल्यातून एका  जांभळ्या कमळाचे रोप मिळाले.  त्याला मंद सुवास  होता  आणि ज्याचा मध्य भाग पिवळा होता . ते कमळ  आमच्या घरी खूप वर्ष राहिले आणि मी ते अनेक मित्रांना दिले.  त्याचा रोहित नातू च्या मामाच्या कॅमेराने काढलेला फोटो. 



काही वर्षांनी आमचे एक नातेवाईक पुण्यात शासकीय नर्सरी मध्ये अधिकारी म्हणून आले. त्यांच्या मदतीने मला पांढरी , पिवळी आणि लाल कमळे मिळाली.  आमचा  पाच फूट बाय पाच फुटाचा हौद  कमळ  पर्णांनी  भरून गेला.   
वृंदाच्या  ओळखीने  स. प.  महाविद्यालयातील  वनस्पती  शास्त्राच्या प्रमुखांकडून  रात्री उमलणारे  चंद्राविकासी  कमल आणले होते. 



पण महर्षीनगर बदलत गेले. चाळींच्या जागीं टोलेगंज इमारती  उभ्या राहू लागल्या. पाणी कमी पडू लागले आणि आमचा  हौदाचा वापर पाण्यासाठी करण्याची गरज वाटू लागली.  कमळांची गच्छन्ति  होणार की काय असे वाटू लागले. 

मी बागेत एक खड्डा  केला, त्यात  एक प्लास्टिक चा कागद अंथरला, त्याचे माती  घातली आणि कमळे लावली. अश्या प्रकारे कमळे आमच्या परसातून  अंगणात आली.  त्या वर्षीच्या पावसाळ्यात  त्या तळ्यात बेडकांच्या अंडी घातली आणि दिवसात लक्ष लक्ष अशी डिंभके  ( टॅडपोल्स.... मराठीत न शिकलेल्यांसाठी  ) दिसायला लागली. कुठून तरी पक्षयांना सुगावा लागला आणि मग अनेक पक्षी  जेवायला आणि  अंघोळीला आमच्याकडे पडीक असायचे. 


पण माझ्या कमळ प्रेमाचा नवा अध्याय सुरु झाला  तो तामिळनाडू मध्ये. सुचिंद्रम मधील  मंदिर पाहून  गावात फेरफटका मारताना एक  मुलगा  कमळे विकत  होता. हे कमळ  म्हणजे आपली लक्ष्मी चे  कमल असते तसे मोठ्या पाकळ्यांचे , विस्तृत, फिकट गुलाबी गुलाबी रंगाचे होते. त्याचा रंग आणि आकार पाहून मी हरखून गेलो. 

थोडे वाचन केल्यानंतर कळले की मी आत्तापर्यंत घरी लावलेली सगळे कमळे ही वनस्पती शास्त्र नुसार Lotus  नव्हती तर water lilly ह्या सदरात मोडणारी होती. ह्या कुठल्याही फुलांपासून बिया तयार झालेल्या नव्हत्या. ह्यांचे कंद हे खूप मोठे  नव्हते. ह्या सगळ्यांची पाने ही पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगणारी होती. ह्या सगळ्यांचे शास्त्रीय नाव, निंफायसी  ( Nymphaeaceae) असे आहे.  ह्या वॉटर लिली  जगात सर्वत्र  आशिया, युरोप  अमेरिका सापडतात. अलास्का च्या अल्पजीवी  उन्हाळ्यात हिम वितळून  तयार झालेल्या दलदलीत फुललेली वॉटर लिली मी पहिली होती. बांगलादेशचे राष्ट्रीय फुल  ही एक जांभळी वॉटर लिली आहे. 

पण मी आता पहिले होते ते  Nelumbo nucifera, किंवा  इंडियन लोटस किंवा सेक्रेड लोटस . भारतीय राष्टीय फुल , भाजप  चे चिन्ह , विष्णू च्या नाभीतून उतपन्न झालेले , श्री लक्ष्मी  वास करते ते , ध्यानस्थ बुद्धाची मूर्ती  ज्यात बसलेली असते ते. हे कमळ  प्रामुख्याने भारत आणि आग्नेय आशियात  सापडते.   ह्या फुलांमध्ये बिया तयार होतात.  ह्याचे कंद भरपूर मोठे होतात आणि ते खातात. ह्याची पाने पाण्याबाहेर  येऊन पाण्याला समांतर वाढतात. ज  फुलांचा आकार असा की   क -क  कमळातला  असे का म्हणत असावे हे कळते. लांबून पहिले तर  क  अक्षरासारखी दिसतात.  

पण  हे कमळ  लावायची इच्छा झाली तरी  माझं  पुण्यातील वास्तव्य संपत आले होते.  डोंबिवली मध्ये राहताना  पनवेल ला एका तळ्यात  हे गुलाबी  कमळ - नलुम्बो  नूसीफेरा  दिसलं  होते .  मग मधली अनेक वर्षे धावपळीची गेली आणि बागकामाचा    छंद  परवडण्यासारखा  नव्हता. 

सॅन  दिएगो ला  बाल्बोआ  पार्क मध्ये परत भरपूर कमळे दिसली. तेथे लोटस  आणि वॉटर लिली  एकाच ठिकाणी लावली आहेत. 


  क्योटो, जपान मध्ये  मी एका उद्यानात पाच फूट उंच वाढलेली कमळाची पाने पहिली  होती .  पण   टोकोयो मधील सर्वात महत्त्वाच्या  मंदिरात  असाकुसा    श्राइन  मध्ये एका कुंडी मध्ये  एक रोप लावले होते आणि त्याला फुल ही आले होते. 


ते पाहून असा प्रयोग घरी करायचे ठरवले. एवढे मोठे कमल घरी कुंडीत  लावता येईल असे कधी वाटले नव्हते. 
परत आल्यावर मी कमळाचे बियाणे मागवले आणि रोपटे तयार केले.  ते एका कुंडीत लावले. आणि  फुल यायची वाट पाहू लागलो. खूप काळ वाट पाहून हे त्याला फुल कधी आलेच नाही. 



नवीन घरी आलयावर मात्र मी परत उचल खाल्ली. ह्यावेळी खूप नर्सरीना  फोन केले. एका  नर्सरी ने माझा नंबर घेऊन ठेवला आणि  दीड  महिन्यपूर्वी मला बोलावून घेतले . त्याच्या नर्सरी मध्ये   नलुम्बो  नूसीफेरा  ची दोन रोपे आणि   पाच  रंगांच्या  निंफायसी ची  वीसेक रोपे आली होती. मी जाई पर्यंत इंडियन  सेक्रेड लोटस चे एक रोप विकले गेले होते. एकमेव रोप घेऊन  मी घरी आलो आणि एक कुंडीत लावले.  

आज त्याला फुल आले आहे आणि खूप मस्त वाटत आहे.