Tuesday, October 23, 2007

डोंगराला अाग लागली पळा पळा पळा ........

अधीक फोटो साठी क्लिक करा. http://picasaweb.google.com/shanshali/CAFire


लहानपणी शाखेत एक खेळ खेळायचो डोंगराला अाग लागली पळा पळा पळा ........
सध्या अाख्खा दक्षीण कॅलीफोर्निया हा खेळ खेळत अाहे. अापल्या मोसमी वारयांप्रमाणे इकडे सांता अाना नावाचे विचित्र उष्ण वारे वाहतात. हे मुख्यत: जमिनीवरुन पॅसिफिक महासागराकडे जातात. ह्याच काळात हवेतील अार्द्रता खुप कमी असते. गेली बारा वर्षे इकडे दुष्काळ असल्याने झाडे-झुडपे वाळलेली अाहे.
माझे घर अाणि अॉफीस व्हायटिंग रॅंच नावाच्या राखीव वनक्षेत्राच्या जवळ अाहे. हे वन सांटियागो कान्यान नावाच्या वनाला जोडलेले अाहे. सांटियागो कान्यान हे सिल्वराडो कान्यान, रोझ कान्यान, लाईमस्टोन कान्यान अश्या वनांना जोडले गेलेले अाहे. हा सर्व डोंगराळ भाग अाहे. (मला इथे राहताना लोणावळे, मळवली अश्या मराठी गावांची अाठवण येते. )


शनिवारी रात्री इकडे सांता अानाचे उष्ण वारे वाहू लागले. पाहता पाहता वेग ताशी ६० ते ७० मैल गेला. निरनिराळ्या कारणांनी दक्षीण कॅलीफोर्नियात १५ ठिकाणी वणवे पेटले. ह्यातील काही अागी मानवनिर्मित किंवा मानवी चूकीने लागल्या. रवीवारी दुपारी सर्वत्र शेकोटी पेटवल्या सारखा वास पसरला. संध्याकाळी माझ्या गॅलरीतून समोरच्या डोंगरावर धूर दिसू लागला अाणि रात्र पडताच जाणवले की संपूर्ण डोंगर ज्वाळांनी वेढला गेला अाहे.

त्यानंतर चालू झाले एक अस्वस्थतेचे पर्व...... केंव्हाही घर सोडून जावे लागेल अशी स्थिती निर्माण झाली. अश्यावेळी काय काय सामान बरोबर घ्यायचे ह्याची यादी केली. पासपोर्ट अाणि इतर महत्त्वाची कागदपत्रे, संगणकाच्या हार्डड्राईव्ह, लॅपटॉप संगणक, पाण्याच्या बाटल्या, काही खाद्य पदार्थ, जुजबी कपडे अश्या गोष्टी बॅगेत भरुन ठेवल्या. ऐनवेळी कुठे जायचे हा प्रश्न होताच. बरयाच ठिकाणी अागी लागल्याने सुमारे ९ लाख लोक विस्थापीत झाले अाहेत. हॉटेलं भरुन गेली अाहेत. शेवटी एका मित्राकडे जायचे ठरले. अाणि अाम्ही अस्वस्थपणे दिवस उजाडण्याची वाट पाहू लागलो.

सोमवारी सकाळी सूर्य खुप उशीरा उगवला. सगळे अाकाश धूराने काळवंडले होते. गॅलरी, जीना, गाडी राख अाणि धुळ ह्यांच्या मिश्रणाने भरुन गेली होती. अाग मात्र अाता दिसत नव्हती, डोंगराच्या दुसरया बाजूला गेली होती. अॉफिसला गेलो, नेहमीपणे काम सुरू होते. दुपारनंतर मात्र गोंधळ सुरू झाला कारण अॉफिस पासून २ मैल अंतरावरील डोंगरावर अाग दिसू लागली. पण अजूनही अाम्हाला घरी जायला सांगीतले नव्हते. सोमवार संध्याकाळ पर्यन्त अॉफिससमोरचा डोंगर संपूर्ण पेटला. पण अाताशा अागीची दिशा बदलली होती. माझ्या घराकडे अाग यायाची शक्यता कमी झाली होती. अाम्ही शांतपणे झोपू शकलो.

अाज सकाळी अॉफिसजवळची अाग मंदावल्याचे जाणवत होते. "अाता झोका नाही " असे अामच्या सुरक्षा अाधिकारयाने जाहिर केले. अाणि त्यानंतर १५ मिनिटात अागीने अापला बेभरवसा दाखवला. वनाचा मोठ्ठा हिस्सा पेटला अाणि अाग समोरच्या रस्त्यापर्यन्त येऊन पोहोचली. अाम्हाला ताबडतोब अॉफीस सोडून जायला सांगीतले.
डोंगराला अाग लागली पळा पळा पळा ........ म्हणत घरी अालो. ही अाग फक्त ३० टक्के नियंत्रणात अाहे. केंव्हाही काहिही होऊ शकते. हवेतील उष्मा खुप वाढला अाहे. श्वासोच्छवास घ्यायला त्रास होत अाहे. गाडीच्या काचेवर राख जमा झाली अाहे. घरात एसी लाउन बसावे लागत अाहे. अॉफीसचे काय होणार अाहे ते माहीत नाही.

अधीक फोटो साठी क्लिक करा. http://picasaweb.google.com/shanshali/CAFire

Labels:

1 Comments:

Blogger Yugendra Bhide said...

Lahanpani khelatana bhiti asaychi fakta aaichya haakechi 'chala, haat pay dhuvun Shubham karoti.. mhanayla ya'. Pan he mhanje bhalatach prakaran ahe.

1:26 PM  

Post a Comment

<< Home