Monday, September 12, 2005

एका मक्षीकेने

आज एक अत्यंत विलक्षण दृष्य पाहीले. एका गांधीलमाशीने एका पतंगाची शिकार केली.

मी सध्या मॆडिसन, विस्कोनसीनच्या पश्चीमेच्या एका उपनगरात काम करतो आहे. कार्यालयाच्या आजुबाजुला खुप झाडी आणी शेती आहे.वाहनतळाच्या बाजुला मकयाचे मोठे शेत आहे. सध्या त्याची कापणी चालू आहे.
आज दुपारी एका पतसंस्थेशी बोलायचे होते म्हणुन मी वाहनतळापाशी आलो. भ्रमणध्वनी वापरून त्यांना संपर्क साधला तर नेहमी प्रमाणे त्यांनी "आप कतार मे है" चा रट्टा लावला. कानाला भ्रमणध्वनी लाउन वाहनतळातून चालताना बाजूच्या हिरवळीवर आलो. तेथे काही माशा रोरावत होत्या.सुरवातीला मला त्या शेणमाशा आहेत असे वाटले पण निरखून पाहीले तर त्या गांधीलमाशा होत्या. मधमाशीच्या आकाराच्या पण पिवळ्या रंगाच्या ह्या माशा गवतावर रोरावताना पाहून मी आश्चर्यचकीत झालो. कारण माझ्या माहितीनुसार गांधीलमाश्या मातीचे घर बनवतात. (भारतात आमच्या घरी जाईच्या वेलावर केलेले घरटे तोडताना मल एक माशी कडकडून चावली होती.)

तेवढ्यात फ़ोनवर एक ठमाकाकू आली, थोडीफ़ार विचारपूस करून "आप कतार मे है" चा रट्टा लावून निघून गेली. माझे लक्ष्य पुन्हा माश्यांकडे. ५ x५ च्या एका हिरव्या पट्ट्यावर अविरतपणे सुमारे सहा माश्या उडत होत्या.
त्या हिरवळीत ऒल होती, म्हणुनच बहुदा किटक आकर्षीत होत होते.

कुठुनतरी तिकडे एक पतंग आला. म्हणजे रुपरंग नसलेले फ़ुलपाखरू! एक दोन गिरक्या मारल्या आणि कोणीतरी तरी त्याला धरुन ठेवावे असे काहीतरी उडु लागला. मला सुरवातीला काही कळले नाही की हा पतंग मांजा कट झाल्यासारखा
का उडतोय? पण बारकाईने पाहीले तर मला धक्का बसला. एका गांधीलमाशीने ह्या पतंगाच्या पोटाला चावा घेउन तिथेच बसली होती. तो जिवाच्या आकांताने उडत होता, पडत होता, कोलमडत होता पण तीने पाश आजीबात सैल सोडला नाही. ती जागची हलत नव्हती. बाकीच्या माश्या उडत उडत येउन पतंगाला दंश करुन जात.

मग काही वेळाने त्याचा विरोध मावळला. तो गलीतगात्र झाला. मग बाकीच्या माशा आल्या आणी त्याला दंश करून होती नव्हती ती धुकधुकी घालवत होत्या. तो पूर्ण निपचीत झाल्यानंतर त्याला सर्व माश्यांनी मिळून गवतात थोडे खोल नेले. बघता बघता तिथे दहा बारा माश्या गोळा झाल्या आणी शिकारीवर ताव मारू लागल्या.
संध्याकाळी येऊन पाहीले तर पतंगाचे अवशेष ही राहीले नव्हते.

हे मला पूर्णपणे नवीन होते, मी माश्यांच्या ह्या सामुदायीक शिकारीबद्दल कधीच वाचले नव्ह्ते. रानटी कुत्री किंवा लांडग्यांच्या कळपाने शिकार करावी इतक्या सफ़ाईने ह्या गांधीलमाश्यांनी ही शिकार केली.

ह्याबद्दल कोणला काही माहिती असेल तर कळवावी.

0 Comments:

Post a Comment

<< Home